इगतपुरीतील प्रकार, आईच्या समयसूचकतेने तिघे सुखरूप

इगतपुरी : धामणगाव परिसरात बर्डे कुटुंबियांच्या घरात मंगळवारी भल्या पहाटे  अनपेक्षित ‘व्याघ्रसंकट’ उभे राहिले. साखरझोपेत असलेल्या आपल्या दोन लहानग्यांच्या शेजारी मच्छरदाणीत चक्क वाघाचा एक बछडाही निवांत झोपलेला पाहून घरातल्यांचा जीवच टांगणीला लागला होता.

तालुक्यातील धामणगाव येथे मनीषा बर्डे या पती आणि दोन मुलांसोबत राहतात. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास त्या काही कारणाने दरवाजा उघडून बाहेर गेल्या असता दरवाजातून हा तीन महिन्यांचा बछडा घरात शिरला. घरात बर्डे यांची दोन्ही लहान मुले मच्छरदाणीत झोपली होती. तो बछडाही थेट मच्छरदाणीत शिरला आणि त्या मुलांशेजारीच झोपी गेला. मनीषा या पहाटेची कामे करण्यात व्यस्त असल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. पहाटे पाच वाजता त्या मुलांजवळ आल्या असता मच्छरदाणीत झोपलेला बछडा पाहून त्यांना धक्काच बसला. त्या अवस्थेतही आरडाओरड न करता प्रसंगावधान दाखवून त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधला.

इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन जाधव आणि अन्य सहकाऱ्यांनी पंधरा मिनिटांत बर्डे यांचे घर गाठले. जाळ्यांच्या मदतीने झोपलेल्या बछडय़ाला त्यांनी ताब्यात घेतले. बछडा अवघ्या तीन महिन्यांचा असला तरी लहान बालकांना इजा करण्याइतपत त्याच्यात क्षमता असते. मात्र त्याला हालचालीची संधीच न मिळाल्याने दोन्ही बालकेही सुरक्षित राहिली.

इगतपुरीत बिबटय़ा दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वन परिमंडळ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.