चार महिन्यापासून ‘जाई’ची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर आज, गुरुवारी संपली. किडनी निकामी झाल्यानंतर तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांना त्याचवेळी तिच्या मृत्युची चाहूल लागली होती. जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न यामुळे ती पूर्वस्थितीत आली. पाच दिवसांपूर्वी पुन्हा तिची प्रकृती खालावली. यावेळी मात्र तिची इच्छाशक्ती कमी पडली आणि गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तिचा मृत्यु झाला. तिला अखेरचा निरोप देताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते.

नोव्हेंबर २०१७च्या पहिल्याच आठवड्यात ‘जाई’ या वाघिणीला साप चावण्याचे निमित्त झाले. त्यावेळी तिचा पाय सुजला, पण उपचारानंतर ती बरी देखील झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या किडनीने दगा दिला. जाईला वाचवता आले नाही याचे शल्य तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वाटत आहे. डॉक्टरांच्या उपचाराला जाईने देखील प्रतिसाद दिला आणि तिची किडनी पूर्ववत काम करू लागली. त्यामुळे उपचाराच्या पिंजऱ्यातून तिला मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले.

मात्र, २५ मार्चला पुन्हा एकदा जाईची प्रकृती खालावली. अतिसारामुळे तिने खाणेपिणे सोडले होते. यापूर्वीही आजारी पडली असताना तिला सलाईनसोबतच शिरेतून पातळ द्रव्याच्या स्वरुपात खायला दिले जात होते.  यावेळी ते देखील शक्य नव्हते. पाच दिवसांच्या आजारपणात तिचे वजन ५०-६० किलोवर आले. यावेळी डॉक्टरांनीही हात टेकले आणि जाईची इच्छाशक्ती कमी पडली. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दहा वर्षाच्या जाईची मृत्यूशी चाललेली झुंज संपली.

शवविच्छेदनानंतर महाराजबाग प्राणीसंग्रहालय परिसरात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांच्या चमूसह डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. अभिजित मोटघरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ. पार्लावार, सहाय्यक कुलसचिव राजेश चव्हाण, डॉ. पोटदुखे, डॉ. जिवतोडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.

दोन नोव्हेंबर २००८ ला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रातील वनविकास महामंडळाच्या मेंढकीच्या जंगलातून वाघीणीचे दोन बछडे महाराजबाग प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले. अवघ्या सहा-सात महिन्याचे हे बछडे आईपासून दुरावल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. ‘जाई’ आणि ‘जुई’ असे नामकरण करण्यात आलेल्या या दोन्ही बछड्यांवर डॉक्टरांनी उपचार केले. जाईने उपचाराला प्रतिसाद दिला, पण जुईची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान तिच्याकरिता दिल्ली येथून विमानाने रक्त आणण्यात आले होते. एका वाघिणीसाठी करण्यात आलेला देशातील हा पहिलाच प्रयोग होता. सुरुवातीला तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली, पण १५ दिवसानंतर तिची प्रकृती खालावली. १८ नोव्हेंबर २००८ ला तिचा मृत्यू झाला.

२००८ मध्ये जुईने या जगाचा निरोप घेतला आणि बरोबर दहा वर्षाने जाईचा देखील मृत्यू झाला. तिच्या जाण्याचे सर्वाधिक दु:ख तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आहे. डॉ. नारायण दक्षिणकर, डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत, डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. सुनील बावस्कर या डॉक्टरांच्या चमुने जुईवरील उपचारावर कोणतीही कसर सोडली नव्हती आणि आताही याच डॉक्टरांच्या चमूसह जाईवर उपचार सुरू होते. माणसांप्रमाणे प्राण्यांचीही किडनी बदलता आली असती तर तो देखील प्रयोग केला असता, असे या डॉक्टरांचे म्हणणे होते.