संरक्षित क्षेत्रातील घटनेने व्याघ्र सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या जाळय़ात अडकून दोन वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची कडक सुरक्षा असतानाही संरक्षित क्षेत्रात फासे लावून वाघिणीची शिकार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षितेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संरक्षित क्षेत्रामधील खातोडा प्रवेशद्वारापासून अवघ्या २०० मिटर अंतरावर  एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांना आढळून आला. हरणाच्या शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या जाळ्यात अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती ताडोबा व्यवस्थापनाने दिली. वनविभागाने वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून शिकाऱ्यांनी ताडोबात प्रवेश केला आणि तारांचे फासे लावले ही बाब चिंताजनक आहे. याप्रकरणी क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून शिकाऱ्यांचा शोध लावण्यात यश येईल.

स्वतंत्र यंत्रणा असूनही..

संरक्षित क्षेत्रामध्ये वन अधिकारी, कर्मचारी सोडले तर कुणालाही प्रवेशास परवानगी नाही. तसेच वाघाच्या संरक्षणासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल आणि ताडोबाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. असे असतानाही वाघिणीची शिकार झाल्याने व्यवस्थापनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ही घटना अतिशय गंभीर असून तारा कोणी लावल्या याचा कसून तपास करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

वाघाच्या हल्ल्यात एक ठार

वाघाने केलेल्या हल्ल्यात गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नंदू मारोती बोबडे असे त्यांचे नाव आहे. बोबडे मोहफुल वेचण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळी गावातील काही लोकांना नंदूचा मृतदेह जंगलात दिसून आला. त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचे समजते.