वनखात्याने पाठविलेल्या बनावट ग्राहकासोबत तब्बल २२ लाख रुपयांत वाघिणीची कातडी व १९ किलो हाडांचा सौदा झाला होता. या लालसेपोटीच आंतरराष्ट्रीय तस्कर सुनील कबीर पून वनखात्याच्या जाळय़ात अडकल्याची माहिती आहे. वनखात्याने बुधवारी लालपेठ येथील सावन लक्ष्मण तोरम (१८) याला आंध्र प्रदेशातून अटक केली, तर विसापूरचा विजय वैद्य व अन्य साथीदार फरार आहेत. ही शिकार तीन महिन्यांपूर्वी झाल्याचे  स्पष्ट झाले. या शिकारी टोळीच्या म्होरक्याचा शोध सुरू असून, या शिकारीचे आंतरराष्ट्रीय संबंधही तपासून पाहिले जात आहेत.
मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वडेट्टीवार यांना महिन्याभरापूर्वी या प्रकरणाची माहिती मिळाली होती. शिकाऱ्याला मुद्देमालासह अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अशातच वनखात्याने बनावट ग्राहक शिकारी सुनील पूनकडे पाठविला.
पूर्वनियोजित सापळ्यानुसार बल्लारपुरात वाघिणीचे अवयव व कातडी दाखविल्यानंतर २२ लाखांत हा सौदा पक्का झाला. त्यानंतर वनखात्यानेच उपलब्ध करून दिलेल्या क्रमांक नसलेल्या इंडिका कारमधून बनावट ग्राहक व आरोपी वरोरा नाका येथे येताच त्यातील पून याला अटक करण्यात आली, तर अन्य आरोपी पळून गेले. फरार आरोपींपैकी सावन लक्ष्मण तोरम आंध्र प्रदेशात पळून गेला होता. वनखात्याने त्याचा पाठलाग करून रात्री उशिरा त्याला आंध्रप्रदेशात अटक केली. तोराम याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.  
 वनपरिक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात किमान सहा आरोपी आहेत. यातील सुनील पून नेपाळचा असून, काही वर्षांंपासून बल्लारपुरात होता. तेव्हापासूनच सुनील, लक्ष्मण व विजय या तिघांची उठबस होती. यातील लक्ष्मणचा लालपेठ परिसरात अवैध दारू व कोळसा विक्रीचा व्यवसाय असून, तर त्याचा मुलगा सावन पानठेला चालवितो. शिकारीच्या वेळेस सहाही जण सोबत होते, अशीही माहिती आहे. वन व पोलिस अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपींना बोलते केल्यावर याबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघिणीची सर्व हाडे व कातडी विसापूर येथील विजय वैद्यच्या घरी लपवून ठेवण्यात आली होती. वन
व पोलिस खाते स्वतंत्र पथकांकडून त्याचा शोध घेत आहे. या सर्व आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार वर्तवली आहे.
दरम्यान, पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीची शिकार झाल्याचे प्राथमिक निरीक्षणानुसार स्पष्ट होत असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी दिली. ही शिकार अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस झाली असावी, असे निदर्शनास येत असल्याचे
त्यांनी सांगितले.

शिकाऱ्यांचे लक्ष्य ताडोबा, बल्लारपूर
राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांचे मुख्य लक्ष्य आहे. येथे शिकार केली की, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश व इतरत्र पळून जाण्यासाठी रेल्वे, विमान व इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शिकाऱ्यांना ताडोबात प्रवेश करणेही कठीण राहिलेले नाही. गेल्याच आठवडय़ात ताडोबा बफर क्षेत्रात वडा़ळ्यावळ शिकाऱ्यांच्या लोखंडी फासात बिबटय़ा अडकला. दोन वर्षांपूर्वी याच प्रकल्पात एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाची पाणवठय़ावर लावलेल्या लोखंडी फासात अडकवून शिकार केली. यानंतरही अशा अनेक घटना समोर आल्या. शिकार करायची, बल्लारपूरला न्यायची आणि तेथून रेल्वेने इतरत्र रवाना करायची, असा हा प्रकार आहे. यापूर्वी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर वाघांची हाडे व कातडय़ासह एकाला अटक झालेली आहे.