जगण्याचा आनंदच घालवून टाकणारी प्रदीर्घ टाळेबंदी आणि त्यातून वाटय़ाला आलेला रूक्ष एकांत यामुळे मेटाकुटीस आलेल्या अनेक निसर्गप्रेमींनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू होताच गुरुवारी पहिल्याच दिवशी येथे भेट दिली. पहिल्याच दिवशी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात किमान ७० गाडय़ांमधून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी दाखल झाले. सुरक्षेचे सारे नियम पाळत वन्यप्रेमींमध्ये या सफारीसाठी उत्साह दिसत होता.

पर्यटकांचे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली गेटवरून आज पहाटे ३५ जिप्सी गाडय़ा सोडण्यात आल्या. सायंकाळच्या सुमारासदेखील तितक्याच जिप्सीतून पर्यटकांनी व्याघ्र सफारीचा आनंद घेतला. सकाळ व सायंकाळ मिळून साधारणत: ७० च्या जवळपास गाडय़ा सोडण्यात आल्या, अशी माहिती जितेंद्र रामगावकर यांनी दिली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशविदेशांतून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र या वर्षी करोनाच्या संकटामुळे पर्यटन बंद होते. निसर्गप्रेमींनाही ऑनलाइन व्याघ्रदर्शन करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागत होती. परंतु दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना येथील पर्यटन सुरू झाले आहे. आता व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्याने पर्यटकांसोबतच स्थानिक आणि व्यावसायिकांमध्येही आनंद व्यक्त होत आहे.

नियमांचे पालन..

सफारीसाठी एका वाहनात सहाऐवजी आता केवळ चारच पर्यटकांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे. मुखपट्टी व सॅनिटायझर पर्यटकांना बंधनकारक आहे. गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुले व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनबंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन करीत पहिल्या दिवशी शेकडो पर्यटकांना व्याघ्र सफारीचा आनंद घेता आला.