व्याघ्रग्रस्त गावकऱ्यांचे आव्हान

राळेगावच्या जंगलात दोन वर्षांपासून दहशत माजविणाऱ्या व १३ जणांचा बळी घेणाऱ्या अवनी टी-१ वाघिणीला ठार केल्यानंतर तिचा  पुळका आलेल्यांनी राळेगाव जंगल परिसरातील गावांमध्ये कुटुंबासह मुक्कामाला राहून दाखवावे, असे थेट आव्हान परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी केले आहे.

सलग दोन हंगाम नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे बुडाल्याचे सांगत ग्रामस्थांनी म्हटले आहे की, ज्यांच्या कुटुंबातील कर्त्यां माणसांचे बळी गेले आणि सतत दहशतीत जीवन जगणाऱ्यांचे हाल काय आहेत, हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल. राळेगावचे आमदार भाजप नेते डॉ. अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या वाघिणग्रस्त गांवकऱ्यांच्या एका मेळाव्यात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरील प्रतिपादन केले.

गावकऱ्यांनी टी-१  वाघिण ठार झाल्यावर दिवाळी आनंदात साजरी केली. आमदार डॉ. उईके यांनी वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त  नवीन कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप केले.

अवनीच्या मृत्यूनंतर देशभर सुरू असलेली ओरड आणि तिच्या मृत्यूवर होत असलेल्या राजकारणाबद्दल गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाघिणीचा पुळका आलेल्यांनी आजही वाघांची दहशत असलेल्या गावांमध्ये आपल्या परिवारासह मुक्कामी राहून दाखवावे, असे आव्हान संतप्त गावकऱ्यांनी केले.