|| रवींद्र जुनारकर

चंद्रपूर जिल्हय़ात मानव-वन्यजीव संघर्षांत २७ जणांचा बळी  

मावळत्या २०१८ वर्षांत देशात ९९ वाघ आणि ४७३ बिबटय़ांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये ११६ वाघांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यावर्षी वाघ मृत्यूची संख्या १७ ने कमी आहे. महाराष्ट्रात यावर्षी २० वाघांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्हय़ात मानव-वन्यजीव संघर्षांत यंदा २७ जणांचा बळी गेला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्यांच्या संकेतस्थळावर यावर्षी ९६ वाघांचा मृत्यू झाल्याचे नमुद केले तर वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या संकेतस्थळावर ९८ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वन्यजीव संरक्षण सोसायटीची नोंद ग्राहय़ धरली आणि आज उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्यात मृत मिळालेला वाघ ग्राह्य़ धरला तर यंदा वाघ मृत्यूची संख्या ही ९९ होते. यामध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू हा मध्यप्रदेशात (२३ ) व महाराष्ट्रात (२० ) आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रा पाठोपाठ कर्नाटक १६, उत्तराखंड ८, उत्तर प्रदेश ६, राजस्थान ६, तामिलनाडू ६, केरळ ५, ओडिसा २ व पश्चिम बंगाल मध्ये १ वाघाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे २०१७ मध्ये देशात ११६ वाघांचे मृत्यू झाले होते. त्या तुलनेत यावर्षी १७ ने ही संख्या कमी आहे. त्यातही मागील वर्षी मध्यप्रदेशात २५ व महाराष्ट्रात २३ वाघांचा मृत्यू झाला होता. यावर्षी रेडीओ कॉलर लावलेल्या वाघांच्या मृत्यूचीही नोंद घेण्यात आली आहे. ४ वाघांना ग्रामस्थांनी जिवंत विद्युत प्रवाह सोडून ठार केले आहे. ३ वाघांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात झाला आहे.

देशात यावर्षी ४७३ बिबटय़ांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रात ९३ बिबट मृत्यूमुखी पडले. यामध्ये रेल्वे व रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या २२ बिबटय़ांचा समावेश आहे. एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ात मानव-वन्यजीव संघर्षांत २७ लोकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश घटना या वाघाने गावात प्रवेश करित मानवाला ठार केले आहे. यामध्ये शालेय क्रीडा स्पध्रेत सहभागी होण्यासाठी आलेली विद्यार्थीनी  व घराच्या अंगणात खेळणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.