पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यातून नैसर्गिक अधिवासात सोडलेल्या आणि दुसऱ्या वाघिणीशी झालेल्या लढाईत जखमी झाल्यानंतर पुन्हा पिंजऱ्यात घेतलेल्या वाघिणीचा काल (शनिवार) मृत्यू झाला.

पांढरकवडा येथील गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या अवनी वाघिणीचा तो मादी बछडा होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंजऱ्यातील वाघांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यास लागणारा वेळ आणि पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पांढरकवडा येथील अवनी वाघिणीवर १४ माणसांच्या मृत्यूचा ठपका ठेवून शिकाऱ्याकडून तिला गोळी घालून ठार करण्यात आले. त्यानंतर तिच्या मादी बछड्याला बेशुद्ध करून पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. यानंतर या मादी बछड्याला शिकारीसाठी प्रशिक्षित करून मोठे झाल्यानंतर जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ मार्चला रेडिओ कॉलर लावून पेंच व्याघ्र प्रकल्पात तिला सोडण्यात आले. मात्र दुसऱ्या वाघिणीशी अधिवसाच्या लढाईत ती जखमी झाली. तिच्या उजव्या पायाला जखम झाल्याने पुन्हा पिंजऱ्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्रितलमांगी येथे तिच्यावर एका बंदिस्त पिंजऱ्यात पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी मादी बछड्याची तब्येत खालावल्याने तिला गोरेवाडा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी दिली. शनिवारी सकाळी शवविच्छेदनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.