आगरझरी परिक्षेत्रातील पारडी पर्यटन रस्ता तूर्त बंद

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अतिउत्साही पर्यटक, गाईड व जिप्सी चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्याचा प्रत्यय रविवारी सकाळी ताडोबाच्या आगरझरी बफर झोन मध्ये आला. एका वाघिणीने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पाश्र्वभूमिवर आगरझरी परिक्षेत्रातील पारडी हा पर्यटन रस्ता काही दिवसांसाठी बंद केल्याची माहिती ताडोबा क्षेत्र संचालक प्रदीप यांनी दिली. तसेच जिप्सी चालकाला निलंबित केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या वाघिणीने यापूर्वीही अशाच पद्धतीने जिप्सीचा पाठलाग केला होता. ही वाघिण माणसाळली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दिवाळी सुटीमुळे ताडोबात देशविदेशातील पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. कोर व बफर झोनमध्ये सकाळ व दुपारच्या सर्व गाडय़ा हाऊसफुल्ल आहेत.  रविवारी ताडोबा बफर क्षेत्रात नागपूरचे काही पर्यटक व्याघ्र भ्रमंती करत होते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने जिप्सी आल्या आणि मध्ये वाघिण होती. जिप्सी व पर्यटकांच्या गर्दीने वाघिण काहीशी बिथरली व एका जिप्सीच्या मागे धावत सुटली. यामुळे जिप्सी चालक, पर्यटक व गाईड घाबरले. जिप्सी कशीबशी बाहेर आणली. जिप्सी चालकाने प्रसंगावधान राखले नसते तर व्याघ्र हल्ल्याची दुर्देवी घटना घडण्याची शक्यता होती.  जिप्सी चालक, पर्यटक व गाईड यांच्याकडून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे.  जिप्सी आणि वन्यप्राण्यांत विशिष्ट अंतर राखण्याचा नियम आहे. मात्र वाघ व  वन्यप्राण्यांना जवळून बघण्याच्या पर्यटकांच्या हव्यासामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत.

.. अन्यथा पर्यटन बंद करण्याचा इशारा

यासंदर्भात ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रदीप यांचेशी संपर्क साधला असता, रविवारच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला.  दोन जिप्सींमध्ये सुद्धा ठराविक अंतर राखणे आवश्यक आहे. परंतु या नियमाचे उल्लंघन होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यावर उपाय म्हणून आगरझरी सोबत बफर झोनमध्ये चालणाऱ्या सर्व जिप्सी चालक व गाईडची एक बैठक घेतली. या बैठकीत एनटीसीएच्या नियमांचे पालन करण्यासोबतच दोन जिप्सी, वन्यप्राणी व जिप्सी यांच्यात ठराविक अंतर ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सर्व नियमांचे पालन झाले नाही तर वेळ पडल्यास ताडोबा बफर झोन मधील पर्यटन बंद करू असा इशाराही दिल्याचे त्यांनी सांगितले.