ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात भानुसखिंडी येथे कक्ष क्रमांक ६४ मध्ये शनिवारी एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. वन्यजीव सप्ताहातच वाघाचा मृत्यू झाल्याने संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतानाच संरक्षित जंगलात भानुसखिंडी येथील कक्ष क्रमांक ६४ मध्ये एक पूर्ण वाढ झालेला वाघाचा मृतदेह पडून असल्याचे वनमजुराला  दिसले. त्याने ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व वनाधिकाऱ्यांना देताच ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड, ताडोबा कोअरचे उपवनसंरक्षक कळसकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाघाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेला असल्याचे निदर्शनास आले. त्याचे शरीर हळूहळू कुजू लागले होते. तसेच मृतदेहाला दरुगधी सुटली होती.

विशेष म्हणजे, वाघाच्या शरीरावरील सर्व अवयव, नखे, चामडी, मिशा शाबूत होत्या. यामुळे हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर वाघाच्या शरीराचे नमुने घेण्यात येऊन ते हैदराबाद, बंगलोर व नागपूर येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.