चंद्रपूर : चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वेच्या धडकेत तीन बछडे गमावलेली वाघीण घटनेच्या चौथ्या दिवशी, सोमवारी चौथ्या बछडय़ासह घटनास्थळी जंगलात भ्रमंती करत असल्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळाले आहे. ही वाघीण नरभक्षक होऊ नये म्हणून वनखाते विविध उपाययोजना राबवत आहे. ही वाघीण चार बछडय़ांची आई असल्याची माहिती वन खात्याकडे होती.

घटनेनंतर चार दिवसांत वाघीण दिसत होती. मात्र, चौथा बछडा दिसत नसल्याने भीतीचे वातावरण होते. त्यासाठी जंगलात शोध मोहीम राबवण्यात आली. वन विकास महामंडळाने जंगलात २५ कॅमेरा ट्रॅप लावले.

तसेच गावात दवंडी पिटवून ग्रामस्थांना वाघिणीपासून सावध केले. सलग चार दिवस ही शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघीण तिच्या चौथ्या बछडय़ासह मस्तपैकी भ्रमंती करत असल्याचे दिसून आले. यामुळे वन खात्याचे अधिकारी आनंदित झाले. एकाच वेळी तीन बछडय़ांचा मृत्यू झाल्याने किमान चौथ्याला तरी वाचवण्यात यश मिळेल, या आशेवर वनविभाग चार दिवसांपासून चोवीस तास जंगलात राबत होता.

चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, वन विकास महामंडळाचे ऋषिकेश रंजन, प्रभुदास दावडा आदी अधिकारी या मोहिमेत सहभागी होते. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र अशा चार शिफ्टमध्ये हे काम सुरू होते. वाघीण घटनास्थळाच्या आजूबाजूलाच फिरत असल्याचे  प्रभुदास दावडा यांनी सांगितले.