जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरासह राज्यात वाढतच आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधितांची व यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. करोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसह व्यवस्थांसाठी येणाऱ्या खर्चात जर कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत  245 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.