राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवली आहे. असे असताना राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने देखील डोकं वर काढलं असून, राज्यात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे ७ हजार ९९८ रूग्ण आढळले असुन, ७२९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ४ हजार ३९८ रूग्णांवर सध्या उपाचार सुरू आहेत. तर, २ हजार ७५५ रूग्ण उपचारातून बरे झाले आहेत.

राज्याला ‘म्युकर’वरील ९ हजारांवर इंजेक्शन्सचा पुरवठा

दरम्यान, राज्याला म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी ९ हजार ३७४ अँफोटेरेसिन बी या इंजेक्शनचा १० ते १५ जूनदरम्यान पुरवठा करण्यात आला आहे. यातील ९६ इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे.

‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर करोनाच्या सातपट

करोना प्रादुर्भावाच्या महासाथीमध्ये आता म्युकरमायकोसिस म्हणजेच काळय़ा बुरशीची लागण झालेले रूग्णही वाढू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर करोनाच्या जवळपास सातपट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ला रोखण्याचेही आव्हान प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

तर, मुंबईत याच आजारामुळे तीन लहान मुलांना आपला डोळा गमवावा लागला आहे. हे तिघेही करोनातून बरे होतंच होते की त्यांना या आजाराची लागण झाली.