हर्षद कशाळकर

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून मांडवाकडे निघालेली बोट शनिवारी बुडाली. या दुर्घटनेत ८५ जणांचे जीव वाचविण्यात यश आले. काळ आला होता पण वेळ नाही.. अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी दिली.

मुंबईहून राजेश शिरभाटे आणि त्यांचे १४ सहकारी अलिबागला पर्यटनासाठी निघाले होते. सकाळी गेट वे ऑफ इंडियावरून त्यांनी अजंठाची बोट पकडली. सगळे जण बोटीच्या ‘अप्पर डेक’वर बसले होते. सुरुवातीचा प्रवास व्यवस्थित झाला. मात्र, मांडवा बंदरापासून साधारण १ सागरी मैलावर असताना बोट जोरात कशावर तरी धडकली. थोडय़ा वेळाने ती हेलकावे खायला लागली. बोटीच्या चालकाने बोट पुढे नेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती बुडण्यास सुरुवात झाली. शिरभाटे आणि त्यांचे सहकारी प्रचंड घाबरले. काय करावे कळेना. बोटीवरचे अनेक जण जिवाच्या आकांताने ओरडत होते.

बोटीच्या खालच्या भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. धास्तावलेल्या स्थितीत ते सर्व जण बोटीच्या ‘लोअर डेक’वर आले. इतक्यात मच्छीमार बनावटीची पोलिसांची गस्ती नौका तेथे आली. त्या बोटीवर असलेले पोलीस कर्मचारी आणि दोन खलाश्यांनी सर्वाना त्यांच्या बोटीत घेतले आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांची गस्ती नौका वेळेवर पोहोचली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. अजूनही तो क्षण आठवला तरी आम्हाला कापरे भरत असल्याचे राजेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी ताज्या : या दुर्घटनेच्या निमित्ताने रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. १७ जुलै १९४७ साली रामदास बोटीला रेवस बंदराजवळ अपघात झाला होता. वादळामुळे भरकटलेली रामदास बोट रेवसजवळील काश्याच्या खडकावर आदळली होती. या वेळी बोटीतून ७०० प्रवाशी प्रवास करत होती. गटारी अमावास्येच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेत बोटीतील ६२५ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.