तारापूर औद्योगिक क्षेत्रात गॅलेक्सी सरफॅक्टटंट या हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीमध्ये  सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात मृत्यू पावलेल्या विजय सावंत यांच्या शोकाकुल नातेवाईकांवर या दुःखाच्या व कठीण परिस्थितीतही  14 दिवस विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. विजय सावंत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी घेवून जात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे राजापूर येथेच 14 दिवसांसाठी विलगीकरण केले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील या कंपनीत सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात विजय सावंत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व नऊ वर्षांचा मुलगा असुन ते बोईसर येथे पास्थळ भागात राहत होते. त्यांचे मूळ गाव सावंतवाडीतील कलंबिस्त असून त्यांचे वडील पांडूरंग सावंत हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. स्फोटात मृत्यू झालेल्या विजय सावंत यांचे पार्थिव गावी सावंतवाडी येथे पाठविण्यासाठी बोईसर पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यांच्या सोबत नातेवाईक व मित्र निघाले होते. मात्र कुडाळ येथे मंगळवारी सकाळी पोलिसांनी वाहन थांबवून मृतदेह व इतर दोन व्यक्तींनाच सोबत जाण्याची अनुमती दिली. तर अन्य सोबतच्या लोकांना माघारी जाण्यासाठी सांगितले.

बोईसरहुन सावंतवाडीकडे निघालेल्या रुग्णवाहिकेसोबत असलेले वाहन बोईसर पासून कुडाळपर्यंत सर्व तपासणी नाक्यावर सोडण्यात आले होते. मात्र पोलिसांनी पार्थिवासोबत असणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना बोईसर येथे परत पाठविले. त्यानुसार एका वाहनामध्ये मृत विजय सावंत यांचे नातेवाईक असलेले सात जण माघारी परतत असताना त्यांना राजापूरमध्ये टोल नाक्यावर अडवण्यात आले. पहाटेपासून दुपारपर्यंत त्यांना राजापूर पोलिसांनी ताटकळत थांबविल्याचे त्यांनी सांगितले. यातच दुपार नंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर करोना बाबतची कोणतीही लक्षणं नसताना देखील त्यांना 14 दिवस विलगीकरण करून ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे या नातेवाईकांनी लोकसत्ताला सांगितले. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये दोन महिला असून अपघाती मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांसोबत प्रवास केल्याने राजापूरमध्ये त्यांनाही थांबवण्यात आले आहे. यावरून अगोदरच दुःखी असलेल्या सावंत कुटुंबीयांचे आपल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील हाल सुरूच असल्याचे दिसत आहेत.

याबाबत रत्नागिरी पोलिस उपअधीक्षक विशाल गायकवाड यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कारण वास्तविक असल्यास सोडुन देऊ असे सांगितले होते.  –