कडक उन्हाची काहिली आणि निर्जल होत चाललेले पाणवठे यामुळे टिपेश्वर अभयारण्यातील सहा पट्टेदार वाघ, चार वाघिणी व त्यांच्या तीन बछडय़ांना तृष्णा शांतीसाठी घनदाट जंगलातून बाहेर येऊन सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हातपंपाच्या पाणवठय़ावर व तळ्यावर येणे भाग पडत असल्याने आता व्याघ्रदर्शनची पर्यटकांची आशा पल्लवीत झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी तीन वाघ एका सौरऊर्जा पाणवठय़ावर आले असतांना ट्रप कॅमेऱ्याने त्यांना कैद केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजेय लांबाडे यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्य़ातील टिपेश्वरला अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिले आहे. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास विदर्भाचे वैभव असलेल्या या अभयारण्यात पर्यटकांचा प्रचंड लोंढा येईल आणि निसर्ग प्रेमींना आनंद मिळेल, शिवाय शेकडो स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल, असे हंसराज अहीर यांनी जावडेकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. टिपेश्वरचे नियंत्रण नागपूर वनविभागाकडे आहे. ते गरसोयीचे असून ते अमरावती विभागाकडे वर्ग करावे, अशी मागणी आहे. कारण अभयारण्य यवतमाळ जिल्ह्य़ात असून यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात येतो.
जीवाची काहिली करणारा उन्हाळा सुरू झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्यातील तेरा वाघांसह अस्वल, नीलगाय, रोही, सांबर, चितळ, काळवीट,भेडकी, रानडुक्कर, हरीण, मसन्याउत, लांडगे, कोल्हे अशा असंख्य वन्यपशूंची आणि मोर, नीलकंठ पोपट, ससाना, देवचिमणी, तितर, बटेर, गिधाड, घुबड, पाणकेंबडी आदी पक्षांची तहान भागवून त्यांची ससेहोलपट थांबवण्यासाठी या प्रकल्पात किमान दहा स्वयंचलित सौरऊर्जा पंप बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा ही पर्यावरणप्रेमींची गेल्या पंधरा वर्षांंपासूनची मागणी असतांना अभयारण्यात असलेले वाघ वाचवणे अतिशय गरजेचे आहे.
सध्या उन्हाळयात त्यांची तहान भागवण्यासाठी चार सौरऊर्जा पंप आहेत पकी एक बंद आहे. उन्हाळयात पाण्यासाठी दोन तळे वगळता अन्य जलाशय नसल्याने बोअरवेल खोदून चार स्वयंचलित सौरऊर्जा पंप बसवण्यात आले आहे. अलीकडे वनखात्याने टँकरव्दारे पाणवठय़ांवर पाणी पुरवण्याची व्यवस्था केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवर पांढरकवडापासून २५ किलोमीटर १५० हेक्टरच्यावर क्षेत्रात विस्तारलेल्या टिपेश्वरचे घनदाट जंगल १९९३ मध्ये अभयारण्य म्हणून राज्य शासनाने जाहीर केले. मात्र, अभयारण्यात आवश्यक असलेल्या किमान सोयींचा अभाव असल्याने या अभयारण्याकडे पर्यटक यायला तयार नव्हते. परिसरातील टिपेश्वर आणि मारेगाव या दोन गावांचे पुनर्वसन झाल्याने अलीकडे अभयारण्य विकासला गती मिळाली आहे. आता वाघ दिसण्याची आशा पल्लवीत झाल्याने आदिलाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुर, रायपूर आदी भागातूनही पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे गजेय लांबाडे यांनी सांगितले.