पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधीपक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच, ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील. असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. (1/2) pic.twitter.com/xyDN7UwUpW
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते राजीव सातव, राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर जोरादार टीका केली आहे. शिवाय, या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून भाजापाने माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 9:34 pm