कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ होणे ही काळाची गरज आहे. या खंडपीठाच्या निर्मितीसाठी प्रसंगी आपल्या पदाचा त्याग करू, अशी भुमिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी व्यक्त केले आहे. यासाठी रस्त्यावर उतरुन लढा देऊ असेही त्यांनी गुरुवारी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालयाच्या ‘न्याय व्यवस्थेचे विक्रेंद्रीकरण’ या विषयावर न्यायमूर्ती नलवडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नलवडे म्हणाले, उच्च न्यायालयात ४० हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. शासन केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. इमारत, निधी, मुलभूत सुविधा असा बागुलबुवा निर्माण केला आहे.

नलवडे म्हणाले, मी मुळचा कोल्हापुरचा आहे, कोल्हापूरच्या लोकांना मागितल्याशिवाय काहीच मिळालेले नाही, त्यासाठी मोर्चा आंदोलने करावी लागली आहेत. १९८४ साली मी कोल्हापुरात असताना कोल्हापुरात खंडपीठ झाले पाहिजे असा प्रस्ताव मांडून आंदोलनाची मोट बांधली होती. त्यानंतर आलेल्या बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने आंदोलने केली, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिधुदूर्ग अशा सहा जिल्ह्यातील १६ हजार वकीलांनी ५४ दिवसांचे कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने सुत्रे हलवून खंडपीठाच्या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू केली.

सरकारने आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या विषयात लक्ष घातले तर खंडपीठाचा प्रश्न एका दिवसात मार्गी लागू शकतो. औरंगाबाद खंडपीठ प्रारंभीच्या काळात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झाले. त्यानंतर त्याला मुलभूत सुविधा पुरवण्यात आला. कोल्हापूरच्या बाबतीत निर्णय घेताना मात्र खंडपीठासाठी इमारत नाही, शासनाकडून निधीची तरतूद झालेली नाही, मुलभूत सुविधांच्या अभावावर बोट ठेवले जात आहे. हे तर कागदी घोडे नाचवण्यासारखे आहे, असेही न्यायमूर्ती नलवडे म्हणाले.