जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणुची लागण झालेले पाच रुग्ण महाराष्ट्रात अढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे. पुण्यामध्ये या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शिवाय, आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात ज्या भागातील रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या भागातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबात पालकांना देखील कळवण्यात आले आहे. त्यातच राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकार करोनाचा फैलाव रोकण्यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेईल अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. अशाच भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी करोनाचा फैलाव रोकण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

पंकजा यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ मास्क घालणे गरजेचे नसून शक्य तितक्या लोकांना घरुन काम करण्यास सांगायला पाहिजे असं म्हटलं आहे. “करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेशे नाही. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी परीक्षेचा कालावधी वगळता शाळा-कॉलेजेसचा सुट्टी दिल्यास काय हरकत आहे. कमी लोकं बाहेर पडले तर कमी गोंधळ होईल आणि यंत्रणांना काम करणे सोप्प जाईल,” असं ट्विट पंकजा यांनी केलं आहे.

मंगळवारी पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे करोनाची बाधा ज्या भागातील नागरिकांना झाली आहे, तेथील नागरिक अधिकच चिंतेत असल्याचेही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खबरदाऱ्या घेतल्या जात आहे. लहान मुलांचा या विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

पुण्यात बुधवारपर्यंत एकूण ३०४ नमुने संकलित करण्यात आले आहेत, या पैकी २८९ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह व पाच पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी दहा नमुन्यांच्या तपासणीचा निकाल यायचा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.