01 March 2021

News Flash

जोडीदाराच्या शोधात वाघिणीची ८० किलोमीटरची भटकंती!

विशेष म्हणजे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील जंगल आता या वाघिणीच्या ओळखीचे झाले आहे.

वाघिण

महाराष्ट्रातून लगतच्या तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्पात स्थिरावलेल्या ‘वैशाख’ या वाघाच्या शोधासाठी  चंद्रपूर जिल्ह्य़ातील वाघीण ‘चैत्रा’ हिने तब्बल ८० किलोमीटरचे अंतर पार केले. ही वाघीणही नियमित तेलंगणात जात असल्याचे वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप वरून निदर्शनास आले आहे. वाघ-वाघिणीच्या या सहवासाची वन विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मध्य चांदा वन विभागांतर्गत येणाऱ्या विरूर वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव येथील एक पट्टेदार वाघ वैशाख हा काही वर्षांपूर्वी लगतच्या तेलंगणा प्रदेशातील शिरपूर येथे गेला. कालांतराने तो महाराष्ट्रात परत येईल असा अंदाज वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा होता. परंतु अनेक वर्षे लोटल्यानंतरही तो महाराष्ट्रात परत आला नाही. सध्या तो तिथे चांगलाच स्थिरावला आहे. शिरपूर लगतच्या कावल व्याघ्र प्रकल्पात त्याचे वास्तव्य आहे. तो अचानक तेलंगणात निघून गेल्याने त्याची जोडीदार चैत्रा बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होती. त्याच्या शोधात तिने राजुरा, गोंडपिंपरी, अंतरगांव, कोस्टाळा,डोंगरगांव, धाबा, झरण परिसरातील संपूर्ण जंगल पिंजून काढले. मात्र शोध लागत नव्हता. शेवटी एक दिवस ती तेलंगणात निघून गेली. दोघांचीही कावल व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात भेट झाली. तेव्हापासून ही जोडी नियमित एकमेकांच्या भेटी घेत असल्याची बाब वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमधून समोर आली आहे. मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, चैत्रा ही वाघीण विरूर वनपरिक्षेत्रातून डोंगरगांव-कोस्टाळा-अंतरगांव मार्गे लगतच्या तेलंगणातील शिरपूर येथे दाखल होते. शिरपूरला लागूनच कावल व्याघ्र प्रकल्पात आहे. तिथे ती वैशाखची भेट घेते आणि पुन्हा विरूरच्या जंगलात परत येते. गेल्या कित्येक वर्षांपासून तिचा हा दिनक्रम बनलेला आहे. विशेष म्हणजे विरूर ते कावल हे जवळपास ८० ते ९० किलोमीटरचे अंतर आहे. कॅमेरा ट्रॅपव्दारे ही बाब समोर आली.

विशेष म्हणजे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील जंगल आता या वाघिणीच्या ओळखीचे झाले आहे. त्यामुळे चैत्राचे वास्तव्य कधी तेलंगणात तर कधी महाराष्ट्रात असते. जोडीदाराला भेटण्याची ओढ मनुष्यालाच नाही तर वन्यप्राण्यांना सुध्दा असते. भेट झाली नाही तर ते सुध्दा तेवढेच अस्वस्थ आणि व्याकुळ होतात ही बाब चैत्र आणि वैशाख या वाघ-वाघिणीच्या जोडप्याने सिध्द करून दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 2:37 am

Web Title: to search a partner tigress wanderings 80 km in chandrapur district
Next Stories
1 राज्यभरातील शिक्षक आता शिक्षणमंत्र्यांच्या तळहातावर!
2 लाखाहून अधिक स्वस्त धान्य दुकानदारांचा काटा बंद
3 विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांचा अतिप्रसंग
Just Now!
X