नक्षलवादी कारवायांच्या धोक्यापासून राज्यातील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर राज्यातही सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू होणार आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याचे संकेत दिले. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

शिंदे म्हणाले, राज्यातील नक्षलवादाचा धोक्यापासून नागरिक आणि मालमत्तांचे संरक्षण व्हावे यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करण्याचा विचार सुरु आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू होईल. राज्यातील नक्षलग्रस्त भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा कायदा राज्यात लागू व्हावा अशी मागणी सातत्याने केली जात होती.

सन २००५ मध्ये छत्तीसगडच्या विधानसभेत विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्यामुळे पोलिसांना नक्षली कारवायांविरोधात कारवाई करताना विशेष अधिकार दिले जातात. या कायद्यातील तरतुदींनुसार, कायदा-सुव्यवस्थेला अडथळा ठरेल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना पोलीस ताब्यात घेऊ शकतात.