जिल्हय़ातील ६८८ ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत आहे. एकूण ६ हजार २६५ प्रभागांसाठी १४ हजार ३६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या १६ हजार ४४ कर्मचा-यांना निवडणूक साहित्याचे आज, सोमवारी सकाळी वाटप करण्यात आले व ते सायंकाळी सर्व ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी दि. ६ रोजी (गुरुवारी) तालुका ठिकाणी होणार आहे.
मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून, सुमारे तीन हजारांवर पोलीस कालच नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. यंदा बंदोबस्तासाठी जिल्हय़ाबाहेरहूनही पोलीस संख्याबळ मागून घेण्यात आले आहे. १२२ ग्रामपंचायती संवेदनशील तर ४ ग्रामपंचायती अतिसंवेदनशील ठरवल्या गेल्या आहेत. सर्व ठिकाणी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली निवडणुका पार पाडल्या जात आहेत. एकूण मतदारांची संख्या १३ लाख २६ हजार ८४१ आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० आहे.
जिल्हय़ात एकूण ७४९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व ५२ ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील ६१ ग्रामपंचायती, २ ठिकाणच्या पोटनिवडणुका, २६० प्रभागांतील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अकोले तालुक्यात ४० पोटनिवडणुका होत्या, मात्र त्यासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : अकोले ५१, संगमनेर ८९, कोपरगाव २९, श्रीरामपूर २६, राहाता २३, राहुरी ४२, नेवासे ५८, नगर ५७, पारनेर ८९, शेवगाव ४९, पाथर्डी ७७, कर्जत ५६, जामखेड ४३ व श्रीगोंदे ६०.