राज्यातील करोनाचा संसर्ग आता अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. तर, आज ४ हजार ९३६ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,१२,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,३८,१५४ (१३.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,१८,७०७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २ हजार ६८८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात लोकल, सिनेमागृह पुन्हा बंद? परीक्षाही ऑनलाईन? वाचा काय म्हणाले विजय वडेट्टीवार!

महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या मुद्द्यांच्या आधारावरच राज्यात यापुढील काळात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. करोनाची लस आली असली, तरी वाढत्या करोनाच्या फैलावाला आवर घालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत देखील वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.