जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या (मंगळवार) मतदान होत आहे. राष्ट्रवादी-थोरात गटाच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी आणि विखे गट-भाजप-शिवसेना यांची जिल्हा विकास आघाडी या दोन मंडळांमध्ये राजकीय चुरस आहे.
बँकेच्या संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील सहा तालुका सेवा संस्थांच्या सहा जागांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १५ जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या १५ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदारांची संख्या ३ हजार ७६० असून तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक अशी तेरा व नगर तालुका आणि शहराचे राष्ट्रीय पाठशाळा असे एक, अशी चौदा मतदान केंद्रे आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिली. मतदानासाठी सर्व केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणी दि. ७ ला नगर येथे सैनिक कल्याण केंद्राच्या सभागृहात (स्टेशन रोड, नगर महाविद्यालयाच्या समोर) होणार आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के (सेवा संस्था, राहाता- विखे गट), बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके (सेवा संस्था, पारनेर), माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजीव राजळे (सेवा संस्था, पाथर्डी- तिघेही थोरात गट) आणि अरुण तनपुरे (सेवा संस्था, राहुरी) या चौघांची बिनविरोध निवड झाली. आमदार शिवाजी कर्डिले (सेवा संस्था, नगर) व चंद्रशेखर घुले (सेवा संस्था, शेवगाव) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राष्ट्रवादी-थोरात गटाचे या निवडणुकीवर वर्चस्व असले तरी काही जागांवर चुरशीची चिन्हे आहेत. सेवा संस्थांमधील श्रीरामपूर, अकोले, जामखेड येथील लढतींचा त्यात समावेश आहे. श्रीरामपूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे विद्यमान संचालक जयंत ससाणे (विखे गट) व इंद्रभान थोरात (राष्ट्रवादी), अकोले येथे बँकेचे विद्यमान संचालक सीताराम गायकर (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजी धुमाळ (संभाव्य विखे गट), जामखेड येथे जगन्नाथ राळेभात व रामचंद्र राळेभात अशा लढती रंगणार आहेत. सेवा संस्थेच्या कोपरगाव येथील बिपीन कोल्हे विरुद्ध अशोक काळे या पारंपरिक राजकीय विरोधकांमधील लढतीकडे लक्ष आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. सेवा संस्था : अकोले- सीताराम गायकर (राष्ट्रवादी-थोरात गट), शिवाजी धुमाळ (विखे गट), संगमनेर- रामदास वाघ (राष्ट्रवादी-थोरात), रंगनाथ खुळे (विखे गट), श्रीरामपूर- इंद्रभान थोरात (स्वतंत्र), जयंत ससाणे (विखे गट). नेवासे- यशवंतराव गडाख (राष्ट्रवादी-थोरात), भगवान गंगावणे (विखे गट). जामखेड- जगन्नाथ राळेभात (विखे गट), रामचंद्र राळेभात (राष्ट्रवादी-थोरात). कर्जत- विक्रम देशमुख (राष्ट्रवादी-थोरात), अंबादास पिसाळ (विखे). श्रीगोंदे- प्रेमराज भोईटे, बाबासाहेब भोस (दोघेही स्वतंत्र). कोपरगाव- बिपीन कोल्हे (विखे-भाजप-सेना आघाडी), अशोक काळे (राष्ट्रवादी-थोरात). शेतीपूरक संस्था : रावसाहेब शेळके (राष्ट्रवादी-थोरात), दादासाहेब सोनमाळी (विखे). बिगरशेती संस्था : आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी-थोरात), सबाजी गायकवाड (स्वतंत्र). महिला (दोन जागा): मीनाक्षी साळुंके (राष्ट्रवादी-थोरात), चैताली काळे (राष्ट्रवादी-थोरात), प्रियंका शिंदे, सुरेखा कोतकर (दोघीही विखे गट), अश्विनी केकाण (स्वतंत्र). अनुसूचित जाती-जमाती : आमदार वैभव पिचड (राष्ट्रवादी-थोरात), अशोक भांगरे (विखे गट). इतर मागासर्गीय : सुरेश करपे (विखे गट), अनिल शिरसाठ (राष्ट्रवादी-थोरात), बाबासाहेब भोस (स्वतंत्र) आणि विशेष मागास प्रवर्ग : बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर (राष्ट्रवादी-थोरात), सुभाष गीते (विखे गट), शिवाजी शेलार (स्वतंत्र).