डान्सबारला पुन्हा परवानगी मिळणे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिताने दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या कर्माची फळं आहेत असंही स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कायदा करण्याची मागणी करणार असल्याचे स्मिता पाटील यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने मुंबईसह महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्यास संमती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय दिल्यावर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. तर आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनीही आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, तरुण पिढीला वाम मार्गाला जाण्यापासून वाचवलं पाहिजे म्हणून आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा डान्सबार सुरु करण्यास संमती मिळते ही बाब खेदजनक आहे असेही स्मिता पाटील यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर मुख्यमंत्री आणि बार मालकांमध्ये डील झाल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्सबार चालक आणि बारबालांना दिलासा मिळाला आहे. बारबालाना टीप न देण्याची अट आणि सीसीटीव्ही लावण्याचा नियमही शिथील करण्यात आला आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० या वेळेत मुंबईसह महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. यामुळे बारबालांना पुन्हा रोजगार मिळू शकणार आहे अशी आशा याचिकाकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. मात्र या निर्णयावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी टीका केली आहे.