राज्यासाठी आजचा दिवस हा दिलासा देणारा ठरला आहे. कारण, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये ६० टक्के कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्याचबरोबर दररोजच्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही आज घट झाली असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज २,९१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ५२ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३,०३९ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या १९,८७,६७८ रुग्णांपैकी १८,८४,१२७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर एकूण ५०,३८८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर सध्या ५१,९६५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७९ टक्के झाले आहेत.