महाराष्ट्रात मागील २४ तासात ४ हजार १३२ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. तर ४ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ९ हजार ६०७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला महाराष्ट्रात ८४ हजार ८२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ९२.४८ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये करोनामुळे झालेल्या १२७ मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण एवढेच आहे त्यात काहीही घट झालेली नाही ही बाब काहीशी चिंता वाढवणारी आहे.

राज्यात आजवर ९७ लाख २२ हजार ९६१ नमुन्यांपैकी १७ लाख ४० हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात ८४ हजार ८२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ८ लाख १९ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत आणि ६ हजार १७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.