गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येसोबतच राज्यात मृतांचा आकडा देखील वाढताच राहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसं दिलासादायक चित्र दिसू लागलं आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात ४२,५८२ नवे करोनाबाधित तर ५४,५३५ डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचं दिसून आलं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.

 

शुक्रवारच्या नव्या आकडेवारीनंतर राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही – डॉ. फौची

मृतांचे आकडे मात्र चिंताजनक!

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला असला, तरी एकूण रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे हा मृत्यूदर कमी दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र मृतांचा आकडा जास्तच राहिला असल्याचं गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.