राज्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच करोनाच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ८९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा आता ७१ हजार ७४२ इतका झाला आहे. महाराष्ट्राचा एकूण मृत्यूदर आजच्या आकडेवारीनंतर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

 

रिकव्हरी रेट वाढल्याने राज्याला मोठा दिलासा!

मंगळवारी राज्यातला रिकव्हरी रेट ८५.१६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर त्याचवेळी ५१ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात करोनामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्त झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण ४८ लाख २२ हजार ९०२ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ४१ लाख ७ हजार ०९२ रुग्ण करोनावर मात करून बरे झाले आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांपैकी सध्या ६ लाख ४१ हजार ९१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात ६३ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २ हजार ८७९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ३३ हजार ८९ इतकी झाली आहे. याच दरम्यान ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मृतांची संख्या ७ हजार ५४ झाली.

 

मुंबईत दिवसभरात २५५४ नवे करोनाबाधित

मुंबईत आज दिवसभरात २ हजार ५५४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ६१ हजार ४२० इतकी झाली आहे. त्यासोबतच आज दिवसभरात मुंबईत ५ हजार २४० रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ५ लाख ९४ हजार ८५९ झाली आहे. मात्र, यासोबतच मुंबईत आज दिवभरात ६२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १३ हजार ४७० इतका झाला आहे.