गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसकट भाजपाचं आख्खं मंत्रिमंडळच बदलून पूर्णपणे नवंकोरं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. ‘मला कुणीही हटवू शकत नाही’, असं म्हणणाऱ्या नितीन पटेल यांना देखील डच्चू देण्यात आला. त्यामुळे भाजपामध्ये नेमकं काय घडतंय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा दिली आहे. “मोदी-नड्डांनी अशा धक्का दिला की राजकारणात काहीच अशक्य नाही. रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना त्यांनी घरी बसवलं. शपथ घेतलेले २४ मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी-नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे”, असं यात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींचा स्वपक्षास जोरदार संदेश!

गुजरातमधल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याच पक्षाला संदेश दिला असल्याचं यात म्हटलं आहे. “रुपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते. पण रुपाणी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरकस संदेश स्वपक्षास दिला आहे. नितीन पटेल स्वत:ला हेवीवेट समजत होते. पण नेतृत्वाची घडीच पूर्णपणे बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. हे धाडसाचे काम असले, तरी स्वपक्षात अशी धाडसी पावलं मोदीच टाकू शकतात”, असं यात म्हटलं आहे.

मोदी है तो मुमकीन है…

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. “मोदी हाच भाजपाचा खरा चेहरा आहे. बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. २०२४च्या तयारीसाठी त्यांनी साहसी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर सगळी जमीन उकरून किडकी झाडं मुळापासून उपटून टाकली. हाच प्रयोग त्यांची सरकारं नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है म्हणायचं ते इथे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

म्हणून मोदींनी दुरुस्तीचा काम हाती घेतले

दरम्यान, अग्रलेखातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले, तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शाह यांनी जिवाची बाजी लावली. केरळात ई-श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. पण अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला आणि भाजपाला विरोधात बसावे लागले. पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच”, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींचं कौतुक करतानाच भाजपावर देखील निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays samna editirial pm narendra modi gujrat cabinet shivsena mocks bjp leaders in maharashtra pmw
First published on: 18-09-2021 at 07:56 IST