२९ लाख रुपयांचा ठपका

वेर्ले शौचालय घोटाळ्यात कोकण आयुक्तांनी सरपंचांना अपात्र ठरविले आहे, तसा आदेश प्राप्त झाला असून गटविकास अधिकारी विनायक ठाकूर यांनी दुजोरा दिला. जिल्हा परिषदेचे लेखापरीक्षण झाले असून २९ लाख रुपयांचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान फौजदारी कारवाई गणेश चतुर्थी सणानंतर होण्याची शक्यता आहे.

वेर्ले शौचालय घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी पंचायत समितीचे गटनेते अशोक दळवी व राघोजी सावंत यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर न्याय मिळाला नसल्याने कोकण आयुक्तांकडे प्रकरण दाखल करण्यात आले होते. वेर्ले शौचालय घोटाळ्याचा ठपका ठेवून ग्रामसेवकाला प्रथम निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान कोकण आयुक्तांकडे सुरू असणाऱ्या प्रकरणी वेर्ले सरपंचांना दोषी मानून अपात्र ठरविण्याचा निर्णय कोकण आयुक्तांनी घेतला.

वेर्ले सरपंच प्रमिला मेस्त्री असून एका महिला सरपंचांना शौचालय घोटाळाप्रकरणी अपात्र ठरविले गेल्याने खरे सूत्रधार नामानिराळे राहिल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सरपंचांना अपात्र ठरविले गेले आहे. तसेच जिल्हा परिषदेने लेखापरीक्षणदेखील पूर्ण केले असून, सुमारे २९ लाख रुपयांचा घोटाळा असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून उघड होत आहे. सर्वसंबंधितांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई लवकरच होईल असे सूत्रांनी सांगितले.