टोलविरोधी आंदोलन व्यवस्थित न हाताळल्याचा ठपका ठेवत कोल्हापूरचे पोलीस उप-अधीक्षक बी. टी. पवार आणि शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. स्वतः पवार यांनीच आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निलंबनाची नोटीस मिळाल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले.
कोल्हापूरात १२ जानेवारी रोजी टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त नागरिकांनी फुलेवाडी व शिरोली टोल नाके पेटवून उद्ध्वस्त करीत आपल्या उद्रेकाचे दर्शन घडविले. टोल रद्द केल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतरही १२ जानेवारीला टोलवसुली सुरूच राहिल्याने संतप्त जमावाने टोल नाके पेटवून दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरात टोलविरोधी आंदोलन सुरू होते. या स्थितीत आंदोलनाचा भडका उडाला असताना ते व्यवस्थितपणे न हाताळता स्वस्थ बसून राहिल्याचा ठपका ठेवत या दोन्ही अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले.