भाजप-शिवसेना सरकारने काही नाक्यांवर टोल माफी आणि काही मार्गावर छोटी वाहने व एसटी गाडय़ांसाठी टोलमधून मुक्ती देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर मनसे समाधानी नाही. राज्यातील महत्वाच्या मार्गावर जिथे जादा टोल घेतला जातो, त्या ठिकाणी पारदर्शकता येणे आवश्यक असल्याचा आग्रह धरत राज ठाकरे यांनी टोलच्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतले जात आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय मनसेचे असल्याचा दावा केला. टोलच्या मुद्यावर भरभरून बोलणाऱ्या राज यांनी मात्र राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांनी रविवारी कुंभमेळ्याची कामे, तयार केलेले गोलाकार रस्ते यांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी टोलच्या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदविली. शासनाच्या निर्णयावर मनसे समाधानी नाही. याआधी राज्य सरकारचे आपण तीनवेळा अभिनंदन केले. शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. केवळ ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला सुरू राहतो. महत्वाच्या महामार्गावर अवास्तव टोल आकारणी केली जाते. अशा टोल नाक्यांवर पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. सर्वाना जाचक ठरलेल्या टोलच्या प्रश्नावर एकाही राजकीय पक्षाने आवाज उठविला नाही, आपली भूमिका मांडली नाही. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते टोलविरोधी आंदोलनात लाठय़ा झेलत जेलमध्ये गेले. मनसेच्या आंदोलनाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सूचित केले.
नाशिकमध्ये भविष्यात वाहनतळांची मोठी समस्या भेडसावणार आहे. त्यासाठी अस्तित्वातील मैदानाखाली भुयारी वाहनतळ उभारण्याची सूचना केली जाणार आहे. राज्य शासनाने पालिका नगररचना विभागाचे सहसंचालक विजय शेंडे यांची केलेली बदली हा बिल्डरधार्जिणा निर्णय आहे. आठ महिने शासनाने महापालिकेला आयुक्त दिले नव्हते. राजकीय सूड शहरावर उगवू नका, असा इशारा राज यांनी दिला. ‘गोदा पार्क’चे काम लवकरच पूर्णत्वास येईल. तसेच पांडवलेण्याच्या पायथ्याशी जैवविविधतेने नटलेल्या उद्यानाच्या कामास लवकरच सुरूवात होईल. अन्य विकासकामे प्रगतीपथावर असून पुढील काही महिन्यात नाशिकचे बदललेले रुप पाहावयास मिळेल, असे राज यांनी नमूद केले.
यावेळी राज्यातील तीव्र दुष्काळी स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित झाला असता राज्यासमोर अनेक प्रश्न असुन ते संपणार नाही असे सांगत परिषद आटोपती घेतली. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आंदोलनामुळे शासनाला टोलमाफीचा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगत पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.