टोल आंदोलकांनी शिरोली टोलनाका जाळून उद्ध्वस्त केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या पूर्व संमतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यातर्फे महापौर सुनीता राऊत, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये नुकसान भरपाईच्या नोटिस लागू केल्या आहेत. प्रशासनाच्या यश कारवाईविरोधात गुरुवारी झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या बठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
कोल्हापूरमधील दोन्ही मंत्र्यांनी दिलेले टोल रद्द करण्याचे आश्वासन धुडकावून आयआरबी कंपनीने जानेवारीत टोल वसुली सुरू केली. याचा परिणाम  शहरातील आंदोलकांनी जाळपोळ, तोडफोड केली होती. या टोलनाका जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी महापौर आमदारांसह नगरसेवक राजू लाटकर, रवी इंगवले, माजी नगरसेवक अजित राऊत, विजय देवणे आदींसह टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी ३ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाईच्या नोटिस बजावल्या आहेत. तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई दहा दिवसांत न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसद्वारे सूचित केले आहे.