मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव नाक्यावरील टोलवाढीस हिरवा कंदील मिळाल्यानंतर शनिवारपासून टोल प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात वाहनधारकांची अक्षरश: वाटमारी सुरू केली. भरमसाठ टोल आकारणीमुळे वाहनधारक चक्रावून गेले. दिवसभर वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांच्यात वादावादी सुरू होती. यामुळे नाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांग लागली. टोल नाक्याच्या संरक्षणासाठी शेकडो पोलीस तैनात झाल्यामुळे ‘सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी वाहनधारकांची अवस्था झाली.
गोंदे ते पिंपळगाव या ६० किलोमीटरच्या टप्प्यासाठी टोलमध्ये तिप्पट वाढ लागू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नाशिक जिल्ह्य़ातील वाहनधारकांची जुन्या दराने टोल आकारणीमुळे सुटका झाली असली तरी उर्वरित सर्व वाहनधारक मात्र भरडले गेले. नाशिक व मालेगाव  जिल्ह्य़ातील वाहने वगळता नाक्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या इतर मोटार व जीपसाठी आता १४० रुपये (दैनंदिन पास २१५), हलकी व्यावसायिक वाहने २२० (३३०) बस व मालमोटार ४४५ रुपये (६६५), अवजड मालवाहू वाहनांसाठी ६७५ रुपये (१०१५) इतका टोल भरावा लागत आहे. या नाक्याचा शेकडो पोलिसांनी शनिवारी सकाळी ताबा घेतला. वसुली कक्षाजवळ त्यांनी ठाण मांडले. पोलीस बंदोबस्तात टोल आकारणी सुरू झाल्यामुळे वाहनधारक चक्रावले. काही वाहनधारकांचे टोल कर्मचाऱ्यांशी शाब्दीक वाद झाले. दिवसभर हा गोंधळ सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या. टोल प्रशासनाच्या मदतीला खडा पोलीस बंदोबस्त असल्याने वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागला.
वाढीव टोलने वाहनधारकांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे पोलिसांच्या मदतीमुळे पहिल्याच दिवशी मोठी वसुली झाल्याने टोल प्रशासन सुखावले होते. नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.  महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर नसेल इतका टोल पिंपळगाव नाक्यावर वसूल केला जात असल्याचा आरोप अनेकांनी केला.
अधिकृत की अनधिकृत ?
पिंपळगाव टोल नाक्याचे ठिकाण अधिकृत की अनधिकृत, यावर प्रशासनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ४० किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके असू नयेत, हा केंद्र सरकारचा निकष आहे. असे असुनही राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव आणि चांदवड येथे टोलनाके उभारताना त्या निकषांचे पालन झाले नसल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले आहे.