सांगली आणि कोल्हापूर भागातील भीषण पूरस्थितीनंतर या भागात मदतीचा ओघ वाढला आहे. मात्र, पुणे-सातारा रस्त्याने पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांवरही टोलधाड सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पूरस्थितीमुळे पुण्यापासून विविध ठिकाणी अनेक मालवाहू वाहने अडकून पडली असून, बहुतांश वाहनचालकांकडील पैसेही संपले आहेत. त्यांनाही टोल भरण्यास सांगितले जात आहे. अशा स्थितीमध्ये या रस्त्यावरील टोल वसुली काही कालावधीसाठी स्थगित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पूरग्रस्तांसाठी शासकीय मदतीसह विविध संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे. पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर आणि आणेवाडी या ठिकाणी टोलची वसुली करण्यात येते. पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी टोलमध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नसल्याचे वास्तव आहे. पूरस्थितीत सातारा ते कोल्हापूर रस्त्यावरील किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवर वसुली करण्यात येत होती. त्याला जोरदार आक्षेप घेण्यात आला. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि टोलचे अभ्यासक संजय शिरोडकर यांनी टोलच्या स्थगितीबाबत शासनाकडे मागणी केली होती. हे टोल राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने या रस्त्यावरील टोल १५ दिवसांकरिता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या पुणे- सातारा रस्त्यावरील टोल वसुली सुरूच असून, मदतीच्या वाहनांनाही त्यातून वगळण्यात आलेले नाही.

पूरस्थितीमध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक सांगलीपासून बंद झाल्यानंतर दक्षिणेकडून पुणे, मुंबई, दिल्ली आदी भागात येणारी आणि दक्षिणेकडे जाणारी शेकडो मालवाहू वाहने अद्याापही रस्त्यात अडकून पडली आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाहन चालक आणि वाहनांवरील कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूकदार असोसिएशनने पुढाकार घेऊन या वाहन चालकांसाठी पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली. सध्या वाहन चालकांकडील पैसेही संपल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा स्थितीत त्यांना टोल न आकारता पुढे सोडण्याची मागणी असोसिएशनकडून करण्यात येत आहे. मात्र, टोल नाका चालकांकडून ती फेटाळण्यात आली. टोल न आकारण्याबाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सांगली-कोल्हापूर रस्त्याप्रमाणे पुणे-सातारा रस्त्यावरही काही दिवसांसाठी टोल स्थगित करण्यात यावा. वाहतूक पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत टोलची आकारणी करू नये, अशी मागणी वेलणकर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पूरस्थितीमुळे शेकडो मालवाहू वाहने रस्त्यालगत उभी

पूरस्थितीमुळे शेकडो मालवाहू वाहने रस्त्यालगत उभी आहेत. वाहनचालकांसाठी पाणी-भोजनाची व्यवस्था आम्ही केली. त्यांच्याकडील पैसे संपल्याने टोल न घेता त्यांना पुढे जाऊ देण्याची विनंती आम्ही केली. मात्र, त्याबाबत लेखी आदेश नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत घेऊन येणाऱ्यांकडूनही टोल घेतला जात आहे. या मार्गावर काही दिवसांच्या टोल स्थगितीबाबत आता आम्ही नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले असल्याचे सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सांगितले आहे.