News Flash

टोमॅटोचे पीक धोक्यात

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेने या भागातील टोमॅटोच्या पिकांची तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव

नारायणगाव : उन्हाळी हंगामात लागवड झालेल्या टोमॅटोच्या पिकावर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत यंदाच्या हंगामात तीन हजार एकरवर टोमॅटोची लागवड झालेली आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेने या भागातील टोमॅटोच्या पिकांची तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

गेल्या १५ दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांकडून विषाणूजन्य रोगांबद्दल तक्रारी येत असल्याने कृषी विभागाचे जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी संयुक्तपणे जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव, रोहोकडी, हिवरे तर्फे नारायणगाव तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी, गावडेवाडी येथील टोमॅटो पीकांची पाहणी केली. त्याचबरोबर फळे प्रयोगशाळेतून तपासली. त्यात  प्रामुख्याने टोमॅटोवर येणारे ‘कुकंबर मोझक’, ‘ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस’,  ‘कॅप्सिकम क्लोरासीस’, ‘पॉटी व्हायरस’, ‘पोटॅटो व्हायरस एक्स’ या प्रकारच्या रोगांचे विषाणू सापडल्याची माहिती नारायणगाव कृषी केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी दिली. पिकांवरील सर्व विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रसशोषक किडींमुळे होतो. परिणामी या सर्व विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून रसशोषक किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे.

भीती काय?

या रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होईलच, पण त्याच बरोबर बाजारात येणारा टोमॅटोचा दर्जा चांगला नसेल. गेल्या वर्षीही विविध रोगांनी राज्यातील टोमॅटो पिकाला ग्रासले होते. त्यामुळे बेंगळुरूमधून राज्यात चांगल्या प्रतीचा टोमॅटो शहरात आयात होत होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:25 am

Web Title: tomato crop danger virus diseases capsicum chlorosis potyvirus potato virus x akp 94
Next Stories
1 बैलांच्या भ्रूणहत्येकडे दुर्लक्ष करून कालवडींचा जन्मदर वाढवणार!
2 शेतकऱ्यांना हमीभाववाढीचा किती लाभ?
3 गुरांचे आठवडी बाजार बंद, मात्र उलाढाल सुरू !
Just Now!
X