दुष्काळाचा परिणाम लागवडीच्या क्षेत्रात घट; आवकही कमी

औरंगाबादेत रविवारच्या आठवडी बाजारात सर्व भाज्यांमध्ये चर्चेत राहिले ते टोमॅटो. बाजारात त्याचा दर होता साधारण शंभर रुपये किलो. तर त्यापेक्षा अधिकचा दर उत्तम प्रतीच्या टोमॅटोचा. तो साधारण एकशे वीस रुपये किलो. गत वर्षीच्या दुष्काळामुळे टोमॅटोचे लागवड क्षेत्र कमी झाल्यामुळे बाजारात आवकही घटली असून त्याचे परिणाम दरवाढीत झाले आहेत. पुढील महिनाभर तरी ग्राहकांना टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

औरंगाबादजवळील वरूड काजी हे टोमॅटो लागवडीसाठीचे गाव म्हणून सुपरिचित आहे. संपूर्ण गाव एकच उत्पादन घेते. सध्या गावात ५०० ते ५५० एकरावर टोमॅटोची लागवड झालेली आहे. गावचा टोमॅटो जयपूर, दिल्ली, आग्रा, कोलकाता, गुवाहाटी, जम्मू काश्मीर ते अगदी चार वर्षांपूर्वी पाकिस्तानातही पाठवला गेलेला आहे. मात्र गत वर्षी दुष्काळ पडला आणि वरुड काजीतील टोमॅटोच्या लागवडीचे क्षेत्र एकदम घटले. पिकांना देण्यासाठी जलसाठय़ांमध्ये पाणी नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोसह इतर कुठलेही उत्पादन घेतले नाही. शेवटचे उत्पादन डिसेंबर, जानेवारीमध्ये घेतले असून त्यानंतर आता जूनमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोचा माल पुढील महिन्यात बाजारात येईल. तोपर्यंत तरी टोमॅटोचे दर चढेच राहतील, असे वरुड काजी येथील टोमॅटो उत्पादक योगेश दांडगे यांनी सांगितले. औरंगाबादेत येणारा टोमॅटो हा वैशाली किंवा हायब्रीड प्रकारचा असून तोच सध्या बाजारात असल्याचे दांडगे यांनी सांगितले.

बटाटय़ांचाही दर वाढलेलेच

बटाटय़ांचेही दर मागील काही महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. दहा ते पंधरा रुपये किलोने मिळणारा बटाटा मागील काही दिवसांपासून बाजारात २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. सहा महिन्यांपासून बटाटय़ाचे दर २० रुपये किलोपेक्षा कमी नाहीत, असे विक्रेते सांगतात. कोथिंबिरीसह पालेभाज्यांचेही दर कडाडलेलेच आहेत. पालक, चुका, तांदुळजा, राजगिरा आदी भाज्यांची दहा रुपयांना एक पेंडी मिळत आहे. भेंडी, शेवगा, गवार ८० ते १०० रुपये किलो तर ४० ते ५० रुपये किलोने वांगे खरेदी करावे लागत आहेत.