काही महिन्यांपूर्वी जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावच्या शेतकऱ्याने आपल्या डाळिंब बागेच्या शेतीवर जेसीबी फिरवला होता. आता जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेतकऱ्याने अकरा एकरातील चारशे टन टोमॅटो शेतातच फेकून दिला असल्याचं समोर आलं आहे. मधुकर कुटे असं या शेतकऱ्याचं नाव असून टोमॅटोला योग्य भाव न मिळाल्याने टोमॅटो फेकून द्यावे लागल्याचे त्याने सांगितले.

डिसेंबर पासून टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील  एका शेतकऱ्यांने अकरा एकरातील चारशे टन टोमॅटो शेतातच फेकून दिला आहे तसेच रोपं उपटून टोमॅटोची शेती पुन्हा करायची नाही असा ठाम निर्धार या शेतकऱ्याने केला आहे. जुन्नर तालुक्याच्या पिंपरी पेंढार येथील मधुकर कुटे यांच्या मालकीची शेती आहे. एका कॅरेटला निदान शंभर ते दीडशे रुपये म्हणजे किलोला पाच ते साडे सात रुपये भाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.

मात्र त्यांच्या टोमॅटोला अडीच रुपये किलो म्हणजे एका कॅरेटला पन्नास रुपायांचाच भाव मिळत आहे. या भावाने चारशे टन म्हणजे वीस हजार कॅरेट टोमॅटोची विक्री केली तर कुटे यांना मुद्दल ही मिळत नाही. उलट मजुरांना खिशातले पैसे द्यावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे त्यांना पंधरा ते वीस लाख रुपयांचा फटका बसला आहे. अनेक वर्षांपासून ते टोमॅटोची शेती करत आहेत.

मात्र त्यांच्यावर अशी वेळ पहिल्यांदाच आली. ही परिस्थिती इतर शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी कुटे यांनी केली आहे. जालन्यातील शेतकऱ्याने देखील कवडीमोल भाव  मिळाल्याने कोबीचा मळा फावड्याने उध्वस्त केल्याचा विडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा फिरत होता. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून याची दखल घेतली गेली होती. या तीन घटनांमुळे भाजपा सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणं अपेक्षित आहे.