चार महिन्यांपूर्वी ८० रुपये किलोपर्यंत भाव खाणारा टोमॅटो आता चार रुपये किलो इतका घसरला. परिणामी टोमॅटो उत्पादकही देशोधडीला लागला आहे.
लातूर जिल्हय़ाच्या चाकूर तालुक्यातील वडवळ, जानवळ, लातूररस्ता, खुर्दळी या गावांत हजारो एकर क्षेत्रावर टोमॅटो उत्पादन वर्षांनुवष्रे घेतले जाते. बाजारातील तेजीमंदीचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने सहन करावा लागतो. या वर्षी खरिपापासूनच दुष्काळाने सोबत धरली. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले. चार महिन्यांपूर्वी टोमॅटोला सर्वाधिक भाव मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या.
करपा, भुरी, मावा अशा विविध रोगांना तोंड देत फवारण्या करीत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. मात्र, बाजारपेठेत मालाची आवक वाढली आणि मालाची गुणवत्ताही योग्य नसल्यामुळे भाव एकदम घसरले. पिकाचा उत्पादनखर्च निघणेही अवघड झाले. चाकूर तालुक्यातील खुर्दळी गावच्या गोिवद जाधव या तरुणाचे उदाहरण प्रातिनिधिक ठरावे. या तरुणाने कृषी पदविकेचे शिक्षण घेऊन शेतीस प्रारंभ केला. आईवडिलांचा सांभाळ व लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेताना सात एकर जमिनीपकी दोन एकरांवर चार महिन्यांपूर्वी तब्बल दीड लाख रुपये खर्च करून त्याने टोमॅटोची लागवड केली. अनेक रोगांचा मारा झाल्यामुळे टोमॅटो उत्पादनात निम्म्याची घट झाली. दोन एकरांत साधारण दीड हजार कॅरेट टोमॅटो उत्पादन व्हायला हवे. मात्र, या वर्षी ते ७०० ते ८०० कॅरेटच्या आसपास होत आहे. एका कॅरेटमध्ये २५ किलो टोमॅटो असतात. बाजारपेठेत कॅरेटचा भाव १२० रुपये आहे. वाहतूक, आडत हा सर्व खर्च किलोला २ रुपये पडतो, त्यामुळे कॅरेटमागे ७० रुपये हातात येतात. या वर्षी आतापर्यंत ३०० कॅरेट उत्पादन झाले. त्यातून अवघे २१ हजार रुपये मिळाले. अजून ३०० ते ३५० कॅरेट उत्पादन होईल. त्याचे २१ ते २५ हजार रुपये मिळतील. एकूण ४५ हजारांच्या आसपास उत्पन्न हाती येईल. मात्र, खर्च दीड लाख व उत्पन्न केवळ ४५ हजार या आतबट्टय़ाच्या व्यवहारामुळे डोके भणाणते आहे. उत्पादनाचा खर्च फेडायचा कसा व नवीन पिकासाठी पैसे कुठून उभारायचे, हा मोठा प्रश्न असल्याचे गोिवद जाधव यांनी सांगितले. गावचे उपसरपंच इस्माईल शेख यांची हीच स्थिती आहे. एरवी पुणे, निजामाबादच्या बाजारपेठेत टोमॅटो विकला जात होता. या वर्षी लातूर, अहमदपूर अशा जवळच्या बाजारपेठेत मिळेल त्या भावात विकण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
वडवळ परिसरात विक्रमी टोमॅटो उत्पादन होते. दररोज २५ मालमोटारी माल बाजारपेठेत पाठवला जातो. दिल्ली, रायपूर, राजमंड्री, अहमदाबादसह थेट पाकिस्तानातही टोमॅटो पाठवला जातो. टोमॅटोचे खरेदीदार परिसरात येतात. स्वत:च पॅकिंगची व्यवस्था करून माल नेतात. या वर्षी दुष्काळाचा फटका व वातावरणातील बदल यामुळे करपा रोग मोठय़ा प्रमाणात पसरल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. गुणवत्ता घसरली. त्यामुळे उत्पादनात घट झाली, शिवाय बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे भाव कोसळले. त्यामुळे टोमॅटो उत्पादक पूर्ण नागवला गेला.
यंदा गुजरातेत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन झाले व त्याची गुणवत्ता तुलनेत चांगली असल्यामुळे गुजरातेत टोमॅटोची मागणी वाढली. परिणामी, महाराष्ट्रातील बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे वडवळ येथील टोमॅटो उत्पादक नूरभाई पटेल यांनी सांगितले. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने कधीही भूमिका घेतली नाही. नवीन आलेले सरकार तरी शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
‘शेतकऱ्यांच्या बाजूने आता का बोलत नाही?’
कांदा, टोमॅटोचे भाव वाढले की सर्व प्रसारमाध्यमांतून मध्यमवर्गीय ओरड करतात. आता टोमॅटो उत्पादकांचा खर्चही निघत नाही. रोगराई पडल्यामुळे टोमॅटोची शेती मोडून पुन्हा नव्याने लागवड करावी लागते. लाखोचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो व अनेक जण आत्महत्येला प्रवृत्त होतात. अशा वेळी कोणीच का आवाज उठवत नाही, असा सवाल निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष मुळे यांनी उपस्थित केला.