देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ वितरण सोहळा येथील जैन हिल्सवर नऊ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता होणार आहे. येथील जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. ए. टी. पाटील, खा. रक्षा खडसे आदी उपस्थित राहणार आहेत.

२०१३-१४ चा व्दैवार्षिक पुरस्कार अकोला जिल्ह्य़ातील चितळवाडी येथील प्रगतशील शेतकरी विजय इंगळे-पाटील यांना देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये आणि पुरस्कारार्थीचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारास यंदा एक तप पूर्ण होत आहे.

ठिबकसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करत पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, पीक पध्दतीत बदल, शेतीला जोडधंद्याची जोड देत पारंपरिकता आणि आधुनिकता यांची सांगड घातल्यास कमी पाण्यातही चांगल्या प्रकारे शेती करता येते, हे इंगळे यांनी दाखवून दिले आहे. टिश्युकल्चर केळीचे उत्पादन घेण्यापासून नवनवीन पध्दतीचा त्यांनी स्वीकार केला. पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी एकेका थेंबाचा ते योग्य वापर करतात. त्यामुळेच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी कपाशीचे एकरी २४ क्विंटल उत्पादन घेतले. त्यांना गुरांचा गोठाही आधुनिक पध्दतीचा आहे. ५० म्हशी आणि ५० गायी त्यांच्याकडे असून गुरांच्या शेणाचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी केला जातो.

बायोगॅसचा उपयोग विजेसाठीही करण्यात येत आहे. कर्तबगारीमुळे वडिलोपार्जित असलेली त्यांची १९ एकर शेती आज ८८ एकपर्यंत गेली आहे.