शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी महावितरणकडून शनिवारी येथील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी उपनगरांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महानगरपालिकेने कळवले आहे.
मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महावितरण कंपनीकडून दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुळा धरणावरील पाणी उपसात बंद पडणार असून, त्याचा परिणाम त्याच दिवशीच्या उपनगरातील पाणीपुरवठय़ावर होणार आहे. सावेडीतील पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, केडगाव, मुकुंदनगर व कल्याण रोड या उपनगरातील पाणीपुरवठा शनिवारी बंद राहील. तसेच रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागासही उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे मनपाने कळवले आहे.