News Flash

चंद्रपूर मालधक्क्यावरील गरिबांसाठीच्या हजार टन गव्हाची पावसामुळे नासाडी

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरील शासकीय अंत्योदय, तसेच बी.पी.एल योजनेअंतर्गत गोरगरिबांसाठीचा १ हजार टन गहू भिजल्याने खराब झाला आहे.

| March 4, 2015 07:02 am

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरील शासकीय अंत्योदय, तसेच बी.पी.एल योजनेअंतर्गत गोरगरिबांसाठीचा १ हजार टन गहू भिजल्याने खराब झाला आहे. वखार महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे या गव्हाची नासाडी झाली आहे.
वखार महामंडळाकडून हा गहू रेल्वेतून दर महिन्याला येथे येतो. रेल्वे मालधक्क्यावर गव्हाची पोती उतरविल्यानंतर ती गोदामात साठविण्यात येतात. मात्र, गरिबांसाठीचे हे धान्य ४ दिवसांपासून मालधक्यावरच पडून होते. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात हा १ हजार टन गहू मोठय़ा प्रमाणात भिजला. चंद्रपूर मालधक्का ते पडोली मालधक्क्यापर्यंत धान्यांची हातळणी व वाहतुकीचे कंत्राट जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन या कंपनीने घेतलेले आहे. कंत्राट घेताना राज्य वखार महामंडळाच्या लखोटा क्रं. १ नुसार कंपनीने स्वत:च्या मालकी हक्काच्या १० ट्रक्स, तसेच अधिपत्याखालील (अटॅच) ३० ट्रक्स, असे एकूण ४० ट्रक्सचे आर.सी. बुकाची प्रत व फिटनेस सर्टिफिकेट शासनाकडे सादर केले. नियमानुसार याच वाहनांमधून चंद्रपूर मालधक्का ते पडोली वखारापर्यंत धान्यांची वाहतूक करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने दिलेल्या कागदोपत्री वाहनांना जळगाववरून आणलेच नाहीत. स्थानिक वाहनांच्या भरवशावर वाहतूक सुरू ठेवली. ट्रकवर आलेली रॅक अंदाजे ८ ते १० तासात खाली होऊन धान्य सुरक्षितपणे वखारीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. मात्र, ही कंपनी रेल्वे रॅक करून हे धान्य डॅमरेज वाचविण्यासाठी प्लॅटफॉर्मवर टाकते व त्यानंतर सावकाश ते वखारीपर्यंत पोहोचवले जाते. यामुळे अवकाळी पावसात धान्याची नासाडी होते. २०१४ च्या जूनमध्येही सुमारे १२३ डबे गहू खाली साठवून ठेवला व त्यानंतर पावसात भिजून सुमारे ६० ते ७० टन गहू खराब झाला होता.
हीच पुनरावृत्ती २०१५ मध्येही करण्यात आली. मात्र, ३ ते ४ दिवसांपासून रेल्वे मालधक्क्यावर धान्य खाली उतरवून ठेवण्यामुळे या अवकाळी पावसात धान्यांची नासाडी झाली. या कंपनीने शासनाची फसवणूक केली. दाखल केलेल्या वाहनांचा वापरच केलेला नाही. वारंवार धान्य सडत असूनही या कंपनीवर कारवाई होत नाही. आम्हाला असा संशय होता की, या कंपनीने वखार महामंडळ अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असून यामुळेच या कंपनीला अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. येत्या ८ दिवसात ही कंपनी व वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सैय्यद अनवर शरफुद्दीन यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 7:02 am

Web Title: tons of wheat spoiled in chandrapur due to unseasonal rain
Next Stories
1 अमरावतीत पुतळे जाळण्याची चढाओढ!
2 बुलढाणा जिल्ह्यत पावसाचा फटका, ३३ जनावरांचा मृत्यू
3 अखेर मुगंटीवारांच्या प्रयत्नांना यश
Just Now!
X