अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपये भरल्याचे उघड

खंडणी आणि अन्य मार्गाने उकळण्यात आलेला पैसा नक्षलवाद्यांच्या काही म्होरक्यांनी आपल्या मुलांना व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आणि त्यांचे आयुष्य ऐषारामात जावे यासाठी वापरल्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

या पैशांना पायबंद घालण्यासाठी मंत्रालयाने आता गुप्तवार्ता आणि तपास यंत्रणा त्याचप्रमाणे विविध कर विभागातील अधिकाऱ्यांचा एक गट स्थापन केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खंडणी आणि अन्य मार्गाने उकळण्यात आलेला पैसा नक्षलवाद्यांच्या म्होरक्यांनी वळविल्याची विशिष्ट प्रकरणे गुप्तवार्ता विभागाने शोधून काढली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाकप (माओवादी) बिहार झारखंड विशेष परिसर समितीचा सदस्य प्रद्युम्न शर्मा याने २०१७ मध्ये आपल्या पुतणीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख रुपये भरले आहेत. तर संदीप यादव याने २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात १५ लाख रुपये बदलून घेतले आहेत. झारखंडमधील नक्षलवादी अरविंद यादव याने आपल्या भावाला खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी १२ लाख रुपये शुल्क भरले आहे. गोळा करण्यात आलेल्या पैशांमधील मोठा वाटा नेत्यांनी वैयक्तिक सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कुटुंबाने ऐषारामात राहावे यासाठी वळविला आहे, मात्र दिशाभूल करण्यात आलेले नक्षलवादी विचारसरणीच्या नावावर जंगलात भरकटत आहेत. नक्षलवाद्यांचे म्होरके युवकांना जबरदस्तीने चळवळीत सामील करून घेत असून विकासाच्या कार्यक्रमांना विरोध करीत आहेत, असा दुटप्पीपणाही उघड झाला आहे, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संदीप यादव, अरविंद यादव, प्रद्युम्न शर्मा आणि अन्य नक्षलवादी मुसाफिर साहनी यांच्याविरुद्ध मनीलॉण्डरिंगचे गुन्हे दाखल केले आहेत.