03 March 2021

News Flash

विदेशातील मागणीमुळे कासवांच्या तस्करीत वाढ

भारतातील कासवांची संख्या झपाटय़ाने कमी झाली असून विदेशात भारतीय कासवांना असलेली मागणी त्यासाठी कारणीभूत ठरली आहे.

| June 9, 2015 01:51 am

भारतातील कासवांची संख्या झपाटय़ाने कमी झाली असून विदेशात भारतीय कासवांना असलेली मागणी त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. कासवांच्या तस्करीबाबत ट्रॅफिक इंडिया या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गेल्या दशकभरात तब्बल ४२ छापे घातले गेले. त्यातून सुमारे २६ हजार स्टार शेल्ड कासवांचा जीव वाचवला गेला. तरीही २००९ ते २०१५ या काळात त्यातूनही अधिक कासवांची आंतरराष्ट्रीय तस्करी झाली आहे. वाघांच्या तस्करीकडे गांभीर्याने बघणाऱ्या वनखात्याचे इतर प्राण्यांच्या तस्करीकडे होणारे दुर्लक्ष त्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
भारतात कासवांचा अधिवास मोठय़ा प्रमाणावर आहे. विदेशातही कासवांच्या भारतीय प्रजातींना विशेष मागणी असल्याने तस्करांचा डोळा भारतातील कासवांकडे आहे. मलेशिया, बांगलादेश, चीन या देशात विकल्या जाणारे सर्वाधिक कासव भारतातीलच आहेत. चीन-मलेशियाजवळील विमानतळावरून हा व्यापार होतो. बांगलादेशात खाण्यासाठी, चीनमध्ये खाण्यासह विकण्यासाठी, तर मलेशियात कासव पाळण्यासाठी सर्वाधिक कासवांची तस्करी होते. त्यातही भारतातील शेडय़ुल एकमधील कासवांची मागणी अधिक आहे. उत्तर प्रदेशात याच कासवांच्या तस्करीमुळे सुमारे १५ प्रजाती धोकादायक वर्गात आल्या आहेत. ‘रेड आईज स्लायडर’ या विदेशी, पण भारतात आढळणाऱ्या प्रजातीला विकण्यासाठी परवानगी आहे. मात्र, ही प्रजाती ‘इंडियन रुफ टर्टल’ या प्रजातीशी साधम्र्य साधणारी असल्याने ‘रेड आईज स्लायडर’च्या नावाखाली या भारतीय प्रजातीच्या कासवांची तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘सिंगापुरी टर्टल’ किंवा ‘रूपैय्या’ या नावाने त्याची विक्री होते. ‘इंडियन रुफ टर्टल’, ‘इंडियन ब्लॅक टार्पियन’ या प्रजातीच्या कासवांचा व्यापार सध्या आघाडीवर आहे.
आसाममधील एका दुर्मिळ कासवाची किंमत २० लाख रुपयाच्या घरात आहे. त्यामुळे कासवांचा हा व्यापार वाघांपेक्षाही मोठा आणि कोटय़वधी रुपयांच्या घरातला आहे. भारतात दर महिन्यात कोणत्या ना कोणत्या भागात कासवांची तस्करी उघडकीस येत आहे. त्यापैकी अलिकडेच मुंबई येथे उघडकीस आलेली १८३ कासवांची तस्करी, तिरुचिरापल्ली विमानतळावर ३०० कासवांची तस्करी आणि
आता नागपुरात रेल्वे स्थानकावर उघडकीस आलेली शेडय़ुल एकमधील १०० कासवांच्या उघडकीस आलेल्या तस्करीने पुन्हा वनखात्यासमोर आव्हान उभे केले आहे. तिरुचिरापल्ली येथे उशीच्या खोळीत मुरमुरे भरून कासव तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, तर नागपुरात मोज्यात भरून होणाऱ्या कासव तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला गेला. जकात आणि रेल्वे विभागाने त्यांची भुमिका निभावली, पण वनखात्याने याची गांभीर्याने चौकशी आणि पाठपुरावा केला तरच बांगलादेश,
मलेशिया, चीनपर्यंतच्या कासवाच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची साखळी सापडू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2015 1:51 am

Web Title: tortoise smuggling on the rise due to demand from foreign
टॅग : Smuggling
Next Stories
1 जैतापूरप्रश्नी मध्यस्थीस मनोहर जोशी उत्सुक
2 ताडोबाच्या बफर क्षेत्रात सायंकाळनंतर प्रवेशबंदी
3 चाळीस टक्के शेतकरी ‘जन-धन’ पासून वंचित
Just Now!
X