राजुऱ्यातील वातावरण तापले

राजुरा येथील केंद्र सरकार अनुदानप्राप्त आदिवासी वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींनी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची रविवारी तक्रार केल्यानंतर सोमवारी आणखी तीन अल्पवयीन आदिवासी मुलींनी तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वसतिगृह उपअधीक्षक नरेंद्र विरूटकरसह नीता ठाकरे व श्रीमती कन्नाके या महिला कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १८ मुलींवर अत्याचार झाला आहे.

राजुऱ्यातील एका प्रसिद्ध नेत्याच्या संस्थेद्वारे ही नामांकित शासकीय शाळा व वसतिगृह चालवले जाते. या वसतिगृहातील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चौकशी करून वसतिगृह अधीक्षक छबन पचारे याला अटक केली. या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या उपअधीक्षक नरेंद्र विरूटकर यालाही बलात्कार, पास्को, आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा या कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या दोघांनाही सोमवारी राजुरा न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

अत्याचाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आणखी तीन मुलींनी पोटदुखणे, चक्कर येणे, झोपेतून घाबरून उठणे यासारख्या तक्रारी सोमवारी पोलीस ठाण्यात केल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडीलही होते. या तिन्ही मुली ८ ते ११ वयोगटातील असून आदिवासी समाजाच्या आहेत. आजच्या तक्रारीने अत्याचारग्रस्त मुलींची संख्या पाच झाली आहे. सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी पोलीस, महिला व बालकल्याण विभागाने मुलींना विश्वासात घेतले तर अनेक मुली तक्रार दाखल करण्यासाठी समोर येतील, अशी माहिती महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ६ एप्रिल रोजी राजुरा ग्रामीण रुग्णालयातून पोलीस ठाण्यात वैद्यकीय अहवाल पाठवून लैंगिक शोषण व प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली होती, परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याने तेव्हा कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप आता महिला संघटना करीत आहेत.

पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय

दरम्यान, आज शेकडो महिला, आदिवासी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात येऊनपोलिसांच्या भूमिकेबद्दल जाब विचारला. याप्रकरणी ठाणेदार बालू गायगोले यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजुरा पोलीस महिला सुरक्षा दक्षता समितीच्या अध्यक्ष स्वाती देशपांडे यांनी केला आहे. दरम्यान, स्वाती देशपांडे व वैजयंती देशकर, मनीषा भाके यांनी सदस्यत्वाचे राजीनामे दिले. राजुरा पोलीस ठाण्यात आज प्रेमांजली महिला मंडळ, तनिष्का महिला मंडळ, मातोश्री महिला मंडळ, शेतकरी संघटना महिला आघाडी, भाजप महिला आघाडी, आदिवासी महिला मंडळ यांच्यासह अनेक महिलांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी राजुरा पोलीस ठाणे गाठून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच वसतिगृहातील सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी केली आहे.

दोषींवर कडक कारवाई करावी

याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दिले आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा हा प्रकार घृणास्पद आहे. या वसतिगृहात १३० मुले-मुली वास्तव्याला आहेत. तेव्हा योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केली आहे.