महाराष्ट्रात आत्तापर्यंत ९३ हजार करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या दोन दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात बुधवारी जी करोनाग्रस्तांची संख्या समोर आली त्यानुसार ४ हजार ३३७ जण करोना बाधित होते तर बुधवारी २२४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. ज्यापैकी ९३ हजार १५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर राज्यातली करोना बाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका, खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे अशीही माहिती टोपे यांनी ट्विट करुन दिली.