06 August 2020

News Flash

सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत दहा दिवस संपूर्ण टाळेबंदी

सोलापूर शहराच्या बरोबरीने जिल्हा ग्रामीण भागात करोना विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे

संग्रहित छायाचित्र

सोलापूर : सोलापूर शहरासह आसपासच्या ग्रामीण पाच तालुक्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात न येता उलट वरचेवर वाढतच चालल्यामुळे संपूर्ण शहरासह संबंधित पाच तालुक्यांमध्ये टाळेबंदी  लागू करण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे. त्यानुसार येत्या १६ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलैपर्यंत दहा दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्याची घोषणा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.

सोलापूर शहराससह लगतच्या उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, बार्शी व मोहोळ आदी भागात, जेथे जास्त प्रमाणात बाधित रुग्ण वाढले आहेत, त्या त्या सर्व गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी पुकारण्यात येत आहे. संपूर्ण टाळेबंदीचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यास अंतिम रूप देण्यात आले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढून रुग्णसंख्या चार हजारांच्या पुढे गेली असून मृत्यूचे प्रमाणही दहा टक्के आहे. त्यामुळे सोलापुरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या स्तरावर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होत्या. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्याबाबत सूतोवाच केले होते. त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे. भाजपचे माजी मंत्री विजय देशमुख यांनी तातडीने संचारबंदी लागू करण्याचा आग्रह धरला आहे. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम आदींनी त्यास कडाडून विरोध दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही संचारबंदीचा निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपविला होता. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बैठक झाली. या बैठकीत टाळेबंदी लागू करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका सभागृहनेते श्रीनिवास करली यांनीही भाग घेतला होता.

खरेदीसाठी धांदल

कोणत्याही क्षणी संचारबंदी लागू होण्याची शक्यता गृहीत धरून शहरात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले. किराणा, भुसार व धान्य दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी उसळल्याचे पाहावयास मिळत आहे.

सोलापुरात करोना रुग्णांचा आकडा चार हजार पार

सोलापूर : सोलापूर शहराच्या बरोबरीने जिल्हा ग्रामीण भागात करोना विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. काल शनिवारी ग्रामीण भागात एकाच दिवशी प्रथमच १०७ बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा ३३ नव्या रुग्णांची भर पडली. शहरातही काल शनिवारी ८६ बाधित रुग्ण सापडले होते. तर दोन दिवसांत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार हजारांचा आकडा पार करून पुढे गेली आहे. तर मृत्यूची संख्याही ३३४ वर पोहोचली आहे. मात्र त्याचवेळी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५१ टक्कय़ांवर स्थिर आहे.

काल जिल्ह्यात प्रथमच नव्याने सापडलेल्या १०७ बाधित रुग्णांमध्ये ५० रुग्ण एकटय़ा बार्शी तालुक्यातील होते. यात एकटय़ा वैराग गावात २२ रुग्ण सापडले होते. त्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा ३३ बाधित रुग्णांची भर पडली आणि पुन्हा दोन रुग्णांना प्राण गमवावे लागले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढून ८५० वर गेली आहे. मृतांची संख्या ३६ झाली आहे. त्याचवेळी ३४० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

इकडे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८६ बाधित रुग्ण सापडले होते. त्यात दोघा मृतांचा समावेश होता. शहरात आतापर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या ३१६१ वर गेली तर मृतांचा आकडा २९८ झाला आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण किंचित घटून ९.४२ टक्के झाले आहे. मात्र करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढून ५५ टक्के झाल्याची आश्वासक बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक २७९ रुग्णसंख्या दक्षिण सोलापुरात असून तेथील मृत्यू सात आहेत, तर अक्कलकोटमध्ये १५६ रुग्ण व ९ मृत आहेत. बार्शीतील रुग्णसंख्या १७८ व मृतसंख्या ८ आहे. याशिवाय उत्तर सोलापूर ९१, मोहोळ ४५, पंढरपूर ४२, माढा २६ याप्रमाणे रुग्णसंख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:08 am

Web Title: total lockdown for 10 days from july 17 to 26 in solapur zws 70
Next Stories
1 वसईच्या देवकुंडी नदीत अडकलेल्या ७ पर्यटकांची सुटका
2 संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस निलंबित, दोन उपनिरीक्षकांच्या बदल्या
3 उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाचा वाढता संसर्ग; 24 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू
Just Now!
X