राज्यात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून  करोनाग्रस्तांच्या संखेत वेगानं वाढ होत आहे. राज्यात आज दिवसभरात नवीन ११३ रूग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ झाली आहे. आतापर्यंत ५६ जण करोनाच्या कचाट्यातून वाचले असून त्यांना डिसचार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागनं दिली आहे.

मुंबईमध्ये आज दिवसभरात १०३ रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोना रूग्णांची संख्या ४३३ झाली आहे. राज्यात सर्वाधिक करोना रूग्ण मुंबईत आहेत. पुण्यात तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.   करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ६९ वर्षीय करोनाबाधित वृद्ध महिलेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही करोनानं हातपाय पसरण्यास सुरु केलं आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तर, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या ३५७७ वर पोहोचली
देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.