जिल्हय़ात आणखी एक मृत्यू व ३८ नव्या रुग्णांची नोंद रविवारी झाली. जिल्हय़ात आतापर्यंत ८९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्येने सतराशेचा टप्पा ओलांडला असून ती १७०३ वर पोहचली. शहरासह जिल्हय़ात वाढती रुग्णसंख्या व मृत्यूदर धोकादायक ठरत आहे.

अकोला जिल्हय़ात करोनाच्या उद्रेकाने अद्यापही थांबण्याचे नाव घेतलेले नाही. रुग्ण संख्येसोबतच करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. दररोज रुग्ण दगावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्हय़ातील एकूण २४६ तपासणी अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी २०८ अहवाल नकारात्मक, तर ३८ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सवरेपचार रुग्णालयातून रविवारी दुपारनंतर तीन जणांना सुट्टी देण्यात आली असून, जिल्हय़ात आतापर्यंत १२५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एका रुग्णांचा मृत्यू झाला. सिंधी कॅम्प येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाला २ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री उपचारादरम्यान ते दगावले.

रविवारी सकाळच्या अहवालात ३८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यामध्ये पक्की खोली येथील आठ जण, आदर्श कॉलनी, अकोट येथील प्रत्येकी सात जण, चांदूर पाच जण, बार्शिटाकळी, कच्ची खोली येथील प्रत्येकी दोन जण, तर राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव, पातूर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. १२७ अहवाल नकारात्मक आले आहेत.

दिग्रसच्या वृद्धाचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी आठ करोनाबाधितांची भर पडली. यातील दिग्रसच्या एका करोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला. इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला आणि पुसद येथील एका पुरुषाचा समावेश आहे. दिग्रस येथील काजीपुरा परिसरातील ६० वर्षीय वृद्ध अस्थमा व क्षय रोगाने त्रस्त असल्यामुळे त्याला शनिवारी उपचारासाठी पुसदच्या एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी प्रथम दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे रविवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास या रुग्णाचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याचे नमुने घेण्यात आले होते. रविवारी दुपारी त्याचा अहवाल सकारात्मक आला. तत्पूर्वीच या वृद्धाचे निधन झाले. या मृत्यूमुळे दिग्रसमध्येही करोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली.